पुणे – शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे ‘जेन झी’ तरुणांच्या आंदोलनांच्या माध्यमातून स्वतःचे राजकीय पुनर्ब्रँडिंग करण्याचा आणि हरवलेला जनाधार परत मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी रविवारी (ता.२६) केली आहे. मुंबईतील ठाकरे बंधूंची ‘जल्लोष सभा’ हे याचेच प्रतिक असल्याचे पाटील म्हणाले. धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याने आता या मुद्द्यावर राजकारण करू नये, असे आवाहन देखील पाटील यांनी केले.
गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची उद्धव यांनी भेट घेवून त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता. धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करीत अगदी शिवसेना भवनासमोर जमलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व देखील केले.पंरतु, हा केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबद्दलचा कळवळा नसून राजकीय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न आहे. युवकांच्या भावना आणि असंतोषाचा वापर करून नव्या पिढीमध्ये स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंकडून होत असल्याचे पाटील म्हणाले.
केंद्र सरकार आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वातावरण तापविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. मात्र, केवळ आंदोलनांना भेटी देऊन किंवा सरकारविरोधी भूमिका घेऊन जनतेचा विश्वास संपादन करता येणार नाही. जनतेला विकास, रोजगार, शिक्षण आणि सुशासनाशी संबंधित ठोस भूमिका व कृती अपेक्षित आहेत. राजकीयदृष्ट्या कमकुवत झाल्यानंतर नव्या पिढीच्या माध्यमातून पुन्हा जनाधार मिळवण्याचा हा प्रयत्न जनतेच्या लक्षात येतोय, युवकांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्याचे साधन न बनता स्वतःच्या प्रश्नांवर जागरूक आणि विवेकपूर्ण भूमिका घ्यावी, असे आवाहनही पाटील यांनी केले.





















