सोलापूर – अभिनव सामाजिक संस्था अध्यक्ष मीनलताई दास यांच्या नेतृत्वात हद्दवाड भागामध्ये आज थोर महापुरुषांच्या विचाराच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी हातात थोर महापुरुषांचे फोटो, तुळशी वृंदावन, गळ्यात टाळ व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतली होती.या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने महिला मुली सहभागी झाल्या होत्या.
माध्यमांशी बोलत असताना मिनल म्हणाल्या, आषाढी एकादशी म्हणजे फक्त पंढरपूरला पायी चालत जाणे किंवा टाळ मृदुंगाचा गजर करणे एवढेच नव्हे तर तो आपल्या संस्कृतीचा व समतेचा आदर्श आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखामेळा,संत नामदेव, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला बंधुता, समानता व न्यायाची आपल्याला शिकवण दिली.
आज आपण या थोर महापुरुषांच्या विचारांची दिंडी आयोजित केली आहे. कारण संतांचे आणि थोर महापुरुषांचे पुरोगामी विचार आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. पायी पंढरपूरला जाण्यासोबतच त्यांचे विचार जर आपण आत्मसात केले तर खरी विचारांची वारी होईल. याच विचारांची पताका घेऊन आज सर्वजण आम्ही एकत्र आले आहोत. या दिंडीसाठी शहरातील विविध भागातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या होत्या. विठू नामाच्या जयघोषात अतिशय उत्साहात दिंडी सोहळा पार पडला.





















