सोलापूर – आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसूत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. वारी व्यवस्थापनातील उत्कृष्ट नियोजन, समन्वय आणि सेवा याबद्दल जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक करत पुढील काळातही अशाच लोकाभिमुख कामाची अपेक्षा व्यक्त केली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील शासकीय महापूजेनिमित्त मुख्यमंत्री पंढरपूर दौऱ्यावर असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी आषाढी वारीदरम्यान भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, स्वच्छता, तात्पुरते निवारा केंद्र, आरोग्य सेवा आणि समन्वय यंत्रणेची माहिती देण्यात आली.
या नियोजनाची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. वारीसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी केलेला समन्वय इतरांसाठीही आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले.
चौकट
वारीतील महत्त्वाच्या सुविधा
लाखो भाविकांसाठी स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
तात्पुरते निवारा व विश्रांती केंद्र
आरोग्य सेवा व आपत्कालीन सुविधा
विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर विशेष भर
कोट
“आषाढी वारीत भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद, प्रशासन आणि सर्व कर्मचाऱ्यांनी संघभावनेने काम केले. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडून मिळालेली ही शाबासकी भविष्यात आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणादायी आहे.”
– इंद्रजित पवार, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सोलापूर
Post Views: 14