सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव, सोलापूरचे प्राचार्य प्रा. डॉ. शंकर दत्तात्रय नवले यांची ‘प्राचार्य के. पी. मंगळवेढेकर गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड झाली आहे. शिक्षण, संशोधन, नवोपक्रम, संस्थात्मक विकास आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल व हरिभाई देवकरण प्रशाला (१९६१ च्या ११ वीच्या बॅच), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय, कसबा चौक, सोलापूर येथे होणार आहे. या कार्यक्रमात सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, लायन्स क्लबचे गव्हर्नर ला. राजेंद्र शहा-कांसवा (PMJF) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
प्रा. डॉ. नवले हे १३ नोव्हेंबर २०१४ पासून एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदेकडून (NAAC) सलग दोन वेळा ‘अ’ श्रेणी, विद्यापीठाच्या AAA मूल्यांकनात ‘ए++’, शिक्षण मंत्रालयाच्या ARIIA आणि इनोव्हेशन सेलकडून राष्ट्रीय स्तरावरील मान्यता, तसेच संशोधन, नवोपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
डॉ. नवले यांनी शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथून पदविका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी, तर मुंबई विद्यापीठातून एम.टेक. व पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. पीएच.डी. संशोधनाचा काही भाग त्यांनी रोम विद्यापीठ, इटली येथे पूर्ण केला असून, ग्रेनोबल विद्यापीठ, फ्रान्स येथे पोस्ट-डॉक्टोरल संशोधनही केले आहे. त्यांना इरास्मस मुंडुस शिष्यवृत्ती आणि युरोपियन आयोग फेलोशिप यांसारखे आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत.
संशोधन क्षेत्रात त्यांनी ३० संशोधन लेख, २० संशोधन सादरीकरणे, ४ पुस्तके, ४ पेटंट, २ कॉपीराइट तसेच अनेक संशोधकांना पीएच.डी. मार्गदर्शन केले आहे. शिक्षण, संशोधन आणि प्रशासन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना यापूर्वी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शिक्षक प्रेरणा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, युवा शैक्षणिक नेतृत्व पुरस्कार, सर्वोत्कृष्ट संशोधक पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
या नव्या पुरस्कारामुळे सिंहगड परिवारात आनंदाचे वातावरण असून, संस्थेचे सहसचिव तथा कॅम्पस संचालक संजय नवले, पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. नवले यांचे अभिनंदन केले आहे.
Post Views: 6