सोलापूर : महापालिकेच्या गाळेधारकांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘अभय योजना-२०२६’ ला आता २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत (पुढील तीन आठवडे) मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या २५ दिवसाच्या कालावधीत गाळे भाडे थकबाकी पोटी १ कोटी ११ लाख ५४ हजार १८३ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ३१ गाळ्यांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे.
महापौर विनायक कोंड्याल यांच्या निर्देशानुसार सुरुवातीला ६ ते ३१ जुलै या कालावधीत राबविण्यात आलेल्या या योजनेला मनपा गाळेधारकांचा प्रतिसाद मिळत असल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मेजर व मिनी गाळेधारक, खुल्या जागाधारक, अधिकृत खोकेधारक, बीओटी गाळेधारक, १५६ गाळेधारक तसेच टी.पी. ३/२३ अंतर्गत येणाऱ्या भाडेकरूंना मार्च २०२६ अखेरची थकबाकी आणि २०२६-२७ च्या पहिल्या सहामाहीचे भाडे एकरकमी भरल्यास १०० टक्के दंड व व्याज माफी दिली जात आहे.
महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाकडून अभय योजनेसोबतच थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी वीणा पवार व सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गाळे सील करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत लँड फीचे ३, मेजर गाळे ९ आणि मिनी गाळे १९ असे एकूण ३१ गाळे सील करण्यात आले आहेत. लिपिक श्रीकांत यादव , दत्तात्रय बनसोडे आणि आर. डी. सुरवसे यांच्या माध्यमातून ही कारवाई केली. अभय योजनेच्या कालावधीत ६ जुलै ते ३० जुलै दरम्यान महापालिकेने १ कोटी ११ लाख ५४ हजार १८३ रुपयांची गाळे भाडेवसुली केली. त्यामध्ये रोख ५२.३० लाख, बँकेत ४६.२० लाख आणि धनादेशाद्वारे १३.०२ लाख रुपये जमा झाले आहेत. तसेच सुमारे ६० ते ९० लाख रुपयांचे धनादेश वटणे अद्याप बाकी असल्याने महसुलात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या मालकीचे ७२६ मेजर, ६५६ मिनी असे एकूण १,३८३ गाळे असून, याशिवाय ३८० खुल्या जागा भाडेतत्त्वावर आहेत. महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते व संबंधित समिती अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत आहे.
कटू कारवाई टाळण्यासाठी अभय
योजनेचा लाभ घ्या : आयुक्त डॉ. ओम्बासे
साधारणता: २१ ऑगस्टपूर्वी गाळे भाड्यासह एसजीएसटी व सीजीएसटीची संपूर्ण रक्कम भरल्यासच १०० टक्के दंड व व्याज माफीचा लाभ मिळणार आहे. मुदत संपल्यानंतर कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याने सर्व गाळेधारकांनी वेळेत थकबाकी भरून योजनेचा लाभ घ्यावा व सीलसारखी कटू कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
—–