बार्शी – आज शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी शिक्षक-पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि पालक यांच्यात सुसंवाद निर्माण करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुवर्णा गव्हाणे या होत्या, तर पालक प्रतिनिधी संतोष गुंड व धीरज शेळके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के. डी. धावणे यांनी प्रास्ताविक करताना विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी संतोष गुंड व धीरज शेळके यांनी आपली मनोगते व्यक्त करताना विद्यालयाच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, शिस्त, आरोग्य व उपक्रमांबाबत विविध प्रश्न व सूचना मांडल्या. त्यावर उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे यांनी सविस्तर मार्गदर्शन करुन पालकांच्या शंकांचे निरसन केले.
पालकांनी संस्था व विद्यालयाने सुरु केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करत काही विधायक सूचनाही मांडल्या. विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. पालकांनीही आपल्या पाल्याच्या बौद्धिक, शारीरिक व नैतिक विकासासाठी अधिकाधिक वेळ देणे आवश्यक आहे. शिक्षक व पालक यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो, असे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, पर्यवेक्षक के. जी. मदने, सर्व पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन के. जी. मदने यांनी केले.
Post Views: 18