पंढरपूर – “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी, कामगार व श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे,” हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला संदेश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा आणि मार्क्सवादी विचारसरणीचा केंद्रबिंदू हा उपेक्षित, वंचित, श्रमिक आणि कष्टकरी समाजाच्या न्याय व हक्कांचा संघर्ष हा असून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये या विचारांचे प्रभावी प्रतिबिंब दिसून येते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील अधिकारप्रदत्त महाविद्यालय, पंढरपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार समारंभ समिती व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तथा लेखन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव होते.
प्रा. डॉ. डांगे पुढे म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जन्मलेले अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस औपचारिक शिक्षण घेऊनही मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक म्हणून जागतिक स्तरावर गौरवले गेले. त्यांच्या साहित्यामधील नायक प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करणारे, सकारात्मक विचारांचे प्रतिनिधित्व करणारे असून स्त्री पात्रे चारित्र्यसंपन्न व मूल्यनिष्ठ आहेत. काल्पनिक कथानकांपेक्षा वास्तवातील कष्टकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणसालाच त्यांनी आपल्या साहित्याचा नायक बनविले. त्यामुळे त्यांच्या साहित्याला वास्तववादाची भक्कम बैठक लाभली.
‘फकीरा’ ही कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस समर्पित केली. तसेच “जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव” या कवितेतून आंबेडकरी विचारांप्रती असलेली त्यांची निष्ठा प्रकर्षाने व्यक्त होते. कामगार चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, स्वातंत्र्य चळवळ तसेच लोककलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभारण्यात अण्णाभाऊ साठे यांचे योगदान मोलाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील तथा रयतमाऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदव्युत्तर व पदवी विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ बाळासाहेब बळवंत यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा सत्कार प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शिक्षण समूहाचे प्रमुख प्राचार्य, डॉ. बब्रुवान रोंगे, उपप्राचार्य प्रा. डॉ. समाधान माने, प्रा. डॉ. राजेश कवडे, प्रा. डॉ. सुशील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य, डॉ. बी. टी. जाधव म्हणाले की, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा वर्धापन दिन या तिन्ही महत्त्वपूर्ण निमित्तांचा संगम या कार्यक्रमामुळे साधला आहे. अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यविश्वातील सर्वश्रेष्ठ लोकसाहित्यिक असून त्यांच्या साहित्यामधील सामान्य माणूस हा केंद्रस्थानी आहे. कामगार चळवळीतील त्यांचे योगदान आणि जागतिक स्तरावर रशियाने घेतलेली त्यांच्या कार्याची दखल ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊंच्या साहित्याचे वाचन करून त्यातून लेखनाची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले, तर आभार प्रा. मारुती नायकू यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे, प्रा. हरीभजन कांबळे, प्रा. डॉ. बापूसाहेब घोडके, प्रा. अंकुश घुले, अभिजीत जाधव, अमोल माने व रामदास भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास वरिष्ठ, कनिष्ठ, व्यावसायिक विभागांतील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 15