सोलापूर – सोलापूर जिल्हा देखरेख संघाच्या (कॅडर) संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम दोन आठवड्यांच्या आत जाहीर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिले आहेत, अशी माहित अॅड. अभिजित कुलकर्णी यांनी दिली.
न्यायालयाच्या या आदेशामुळे देखरेख संघाच्या रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सुनावणीदरम्यान देखरेख संघ गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ प्रशासकांच्या ताब्यात असूनही निवडणूक घेण्यात आलेली नसल्याची बाब न्यायालयाने गांभीर्याने घेतली. संस्थेतील लोकशाही प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त करत निवडणूक प्रक्रिया तातडीने राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली.
दरम्यान, प्रशासकाने निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला निधी यापूर्वीच जमा केला असल्याचे न्यालयालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दोन आठवड्यांच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे अपेक्षित असून त्यानंतर मतदार यादी, उमेदवारी अर्ज, छाननी, माघार आणि मतदानाची प्रक्रिया नियमानुसार पार पडणार आहे. या निर्णयामुळे देखरेख संघाच्या सदस्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post Views: 9