सोलापूर : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-2026 मोहिमेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी रविवारी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देत सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे आणि कोणताही मतदार वंचित राहू नये, यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी एम्प्लॉयमेंट चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल स्कूल, जुळे सोलापूरमधील भारती विद्यापीठ बाल विकास मंदिर, नई जिंदगी परिसरातील नॅशनल उर्दू स्कूल, सोशल स्कूल तसेच रामवाडी येथील अण्णासाहेब पाटील महाविद्यालय (कॅम्प प्रशाला) येथील मतदान केंद्रांना भेट दिली.
यावेळी त्यांनी बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्याकडून मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामाचा आढावा घेतला. मतदान केंद्रांवर मतदार याद्या नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध आहेत का, मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती, पत्ता बदल यासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन मिळत आहे का, अर्ज व कागदपत्रांची पूर्तता सुरळीत होत आहे का, याची त्यांनी प्रत्यक्ष खात्री केली.
डॉ. ओम्बासे यांनी प्रत्येक केंद्रावरील कामकाजाची नियमित नोंद ठेवून संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्याकडे वेळेत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच मतदार पुनरीक्षण मोहिमेची व्यापक जनजागृती करून प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत ही प्रक्रिया पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी प्रभावी समन्वय ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, विभागीय अधिकारी जावेद पानगल, राघवेंद्र गयाधनकर, शाम कन्ना, प्रकाश सांवत, रजाक पेंढारी, अमर कादे, संबंधित प्रभागांतील नगरसेवक-नगरसेविका तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 16