मंगळवेढा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धडाडीचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या राजकीय भूमिकेला आणि संघर्षाला बळ देण्यासाठी मंगळवेढा येथील शिवसैनिक आणि युवासेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. युवासेनेच्या वतीने मंगळवेढा येथील ऐतिहासिक आणि पवित्र ‘श्री संत चोखामेळा समाधी मंदिर’ परिसराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुधाचा जाहीर अभिषेक (दुग्धाभिषेक) करण्यात आला.युवासेना शहर प्रमुख अरविंद नाईकवाडी यांच्या विशेष नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये खासदार संजय राऊत हे सातत्याने पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत आहेत. त्यांच्या याच लढवय्या आणि आक्रमक बाण्याला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी युवासेनेने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते.संत चोखामेळा मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमात युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या समर्थनार्थ आणि नेत्यांच्या जयघोषात परिसर दणाणून सोडला. “संजय राऊत साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.याप्रसंगी बोलताना युवासेना शहर प्रमुख अरविंद नाईकवाडी म्हणाले की, “पक्षाशी एकनिष्ठ राहून अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या संजय राऊत साहेबांच्या पाठीशी
मंगळवेढ्यातील संपूर्ण युवासेना आणि शिवसैनिक खंबीरपणे उभे आहेत. हा दुग्धाभिषेक म्हणजे त्यांच्या लढ्याला आमच्याकडून मिळालेली एक आदरयुक्त पावती आहे.”या अनोख्या आंदोलनाची आणि उपक्रमाची सध्या मंगळवेढा शहर व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि तरुण कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली होती.
Post Views: 23