बार्शी – शहरातील श्री भगवंत मंदिर परिसरात गजानन महाराज पालखी सोहळ्यादरम्यान दर्शनासाठी आलेल्या एका विवाहित महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
याबाबत अनुराधा समाधान सुरवसे (वय २०, रा. खामगाव, ता. बार्शी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी या आपल्या कुटुंबीयांसह श्री गजानन महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी बार्शी येथे आल्या होत्या. दर्शनानंतर श्री भगवंत मैदान परिसरातील स्टॉलवर स्टेशनरी साहित्य खरेदी करत असताना त्यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यानंतर त्यांनी कुटुंबीयांसह परिसरात शोध घेतला; मात्र मंगळसूत्र मिळून आले नाही. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ते चोरुन नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चोरीस गेलेल्या दागिन्यात सुमारे २ ग्रॅम वजनाचे, दोन सोन्याचे डोरले व दोन सोन्याचे मणी असलेले मणी मंगळसूत्र असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करुन पुढील तपास करण्यात येत आहे.
Post Views: 24