सोलापूर – जिल्हा परिषद सोलापूरच्या अखत्यारीतील जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृहाची पाहणी करून विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आल्याचे सोलापूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सांगितले.
दरम्यान, वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेली निवास व्यवस्था, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच इतर मूलभूत सोयी-सुविधांची सविस्तर पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांचा आढावा घेत सुविधांमध्ये आवश्यक ते बदल व सुधारणा करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरणासोबत सुरक्षित आणि सुसज्ज निवास सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. वसतिगृहातील सुविधा अधिक परिणामकारक आणि दर्जेदार करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे यावेळी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी स्पष्ट केले.
या पाहणीवेळी कार्यकारी अभियंता असिफ खैरदी, सहाय्यक अभियंता चेतन वाघमारे, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक सुतार तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कोट
आवश्यक सुधारणा करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना
विद्यार्थ्यांना केवळ निवासाची सुविधा देणे पुरेसे नाही, तर त्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देणे ही जिल्हा परिषदेची जबाबदारी आहे. जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृहातील सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सांगितले.
कोट
आवश्यक दुरुस्ती व सुधारणा प्राधान्याने घेणार
वसतिगृहातील इमारत, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांची तांत्रिक पाहणी करण्यात आली आहे. पाहणीत आढळलेल्या त्रुटी दूर करून आवश्यक दुरुस्ती व सुधारणा प्राधान्याने करण्यात येतील. विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बांधकाम विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.असे कार्यकारी अभियंता असिफ खैरदी यांनी सांगितले..























