सोलापूर : आजची स्पर्धा ही केवळ पदवीची नाही, तर कौशल्याची आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान आणि सर्जनशील विचारशक्ती ही उद्याच्या जगाची नवी भाषा आहे. या भाषेवर प्रभुत्व मिळवणारे विद्यार्थीच भविष्याचे नेतृत्व करतील. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात शिकणे थांबले, तर प्रगतीही थांबते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनीने काळाच्या पुढे राहण्याची तयारी ठेवली पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी केले.
सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय आणि अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘क्रिएटिव्ह स्किलिंग ट्रेनिंग प्रोग्राम’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रशिक्षक ऋषिकेश जेऊरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यक्रमात डिजिटल स्किल्स, क्रिएटिव्ह स्किल्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवतंत्रज्ञानाचा वापर, संवाद कौशल्य, नवोपक्रम आणि रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या कार्यक्रमास डॉ. नागोराव भुरके, डॉ. संतोष मारकवाड, प्रा. राशद शेख यांची उपस्थिती होती. विद्यार्थिनींना भविष्याभिमुख कौशल्यांनी सुसज्ज करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन झाले.
——-
*कौशल्य विकास हीच सर्वात मोठी गुंतवणूक
यावेळी प्राचार्य डॉ. ढेरे म्हणाले की, शिक्षणाचा खरा उद्देश केवळ पदवी देणे नाही, तर व्यक्तीला सक्षम, स्वावलंबी आणि समाजोपयोगी बनविणे हा आहे. येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक क्षेत्रांचे स्वरूप बदलणार आहे. अशा वेळी विद्यार्थिनींनी बदलांना घाबरण्याऐवजी त्यांना स्वीकारून नव्या संधींचे स्वागत केले पाहिजे. महाविद्यालयातून नोकरी शोधणाऱ्या नव्हे, तर रोजगार आणि संधी निर्माण करणाऱ्या विद्यार्थिनी बाहेर पडल्या पाहिजेत. त्यासाठी कौशल्य विकास हीच सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
Post Views: 8