छत्रपती संभाजीनगर – पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासनाच्या धोरणानुसार रोख बक्षीसाची रक्कम आणि शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी विधान परिषद आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात मुंबई येथे आमदार सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. नवी दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत पहिली विश्वचषक खो-खो स्पर्धा अत्यंत दिमाखात पार पडली होती. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाने १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक स्पर्धेत भारत देशाच्या पुरुष आणि महिला खो-खो संघाने चॅम्पियन ठरत सुवर्णपदक पटकावले होते.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या ७ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार (जीआर), वरिष्ठ विश्वचषक (वर्ल्ड कप) स्पर्धेत सांघिक क्रीडा प्रकारातील विजेत्या खेळाडूंना २.२५ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक देण्याचे प्रावधान आहे. मात्र, या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना अद्याप हे घोषित प्रोत्साहनपर इनाम मिळालेले नाही. त्यामुळे या खेळाडूंना त्वरित रोख बक्षीस रक्कम वितरीत करावी आणि नियमानुसार शासकीय सेवेतमामा सामावून घेण्यात यावे, अशी आग्रही विनंती आमदार सतीश चव्हाण यांनी केली.
आमदार सतीश चव्हाण यांच्या या निवेदनाची आणि मागणीची गांभीर्याने दखल घेत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणी तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी यादरम्यान दिली.






















