पंढरपूर – राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ जाहीर केली या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पंढरपूर तालुक्यातील ९७ गावातील ३ हजार २२४ पात्र थकबाकीदार लाभार्थी शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती सहा. निबंधक सुनील तेलंगरे यांनी दिली.
राज्य शासनाने या योजनेद्वारे थकीत पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंढरपूर तालुक्यात बँक ऑफ इंडिया ६९२,महाराष्ट्र ग्रामीण बँक ५८१, बँक ऑफ महाराष्ट्र ५५८,युनियन बँक ऑफ इंडिया ५०८, बँक ऑफ बडोदा १६९,स्टेट बँक ऑफ इंडिया १०९, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ०२ अशा विविध राष्ट्रीयकृत तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ६०५ या बँकांद्वारे कर्ज घेतलेल्या पात्र ३ हजार २२४ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी लाभ मिळवण्यासाठी ई-केवासी (आधार प्रमाणीकरण) करणे अनिवार्य आहे. आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले अग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदवणे किंवा तयार करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी आपले आधार कार्ड व त्यावर लिंक असलेला मोबाईल क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत ई-केवायसी पूर्ण करू शकतात.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ पात्र शेतकऱ्याची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून पंढरपूर तालुक्यातील ९७ गावातील ३ हजार २२४ पात्र शेतकऱ्यांची गावपातळीवर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी ई केवायसी करण्याकरता आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे व केंद्रावर कोणतेही शुल्क न देता विनामूल्य माहिती भरून पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा यासाठी कोणतेही शुल्क देऊ नये, असे आवाहन सहाय्यक निबंधक सुनील तेलंगरे यांनी केले आहे.
विशिष्ठ क्रमांकाचे यादीत नाव आलेल्या शेतक-यांना त्यांचे कर्ज खात्याबाबत तक्रार असल्यास त्यांना योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहितीही सहाय्यक निबंधक सुनील तेलंगरे यांनी दिली.
Post Views: 8