सोमवारी (दि. १०) झालेल्या ‘भावतरंग – संतवाणी ते सुगम संगीत’ या कार्यक्रमाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. गायिका सायली साठे आणि डॉ. विलास कुलकर्णी यांच्या सुमधुर भक्तिगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संतवाणीतील आध्यात्मिक विचार आणि सुगम संगीताची सुरेल मेजवानी यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक तसेच समाजबांधवांचा डॉ. अनिल सर्जे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच दहावी, बारावी आणि पदवी-पदविका परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सेवेतून संतविचारांची अनुभूती
मंगळवारी (दि. ११) सकाळपासूनच विविध सेवाभावी उपक्रमांना सुरुवात झाली. रक्तदान शिबिरासोबत शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त महापूजा व गुलाल कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.
दुपारी आयोजित महाप्रसादाचा भाविक व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. याचवेळी झालेल्या आरोग्य शिबिरात विविध आजारांची तपासणी व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तब्बल १५ सेवाभावी व नामवंत डॉक्टरांनी या शिबिरात सहभाग घेत समाजबांधवांना वैद्यकीय सेवा दिली.
‘धार्मिक श्रद्धेला सामाजिक सेवेची जोड देत संत नामदेव महाराजांचा मानवतेचा संदेश कृतीतून जपण्याचा प्रयत्न या उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आला,’ अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक केकडे, धनंजय जवंजाळ, कार्याध्यक्ष राजेश केकडे, भागवत माणकुसकर, दिनकर चांडोले, बाळासाहेब भस्मे, मुकुंद सूत्रावे, भगवान निकते, बाळासाहेब शित्रे, डॉ. सारिका होमकर, नामदेव उंडाळे तसेच संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सेवासदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
श्रद्धा, संस्कार आणि समाजसेवेचा संगम
संत नामदेव महाराजांच्या विचारांचा वारसा केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता रक्तदान, आरोग्यसेवा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि गुणवंतांचा गौरव अशा उपक्रमांतून समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या सोहळ्यातून करण्यात आला. त्यामुळे संजीवन समाधी सोहळ्याला भक्तीबरोबरच सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर स्पर्श लाभला.




















