सोलापूर : मोबाईलच्या पडद्यावर माहितीचा महासागर एका स्पर्शावर उपलब्ध असला, तरी विचारांना खोली, व्यक्तिमत्त्वाला प्रगल्भता आणि जीवनाला व्यापक दृष्टी देण्याचे सामर्थ्य आजही ग्रंथांमध्येच आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी केले.
सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. ढेरे म्हणाले की, ग्रंथांत अनेक पिढ्यांचे अनुभव, विचार, संघर्ष आणि ज्ञान सामावलेले असते. ग्रंथामुळे व्यक्ती स्वतःशी आणि समाजाशी संवाद साधायला शिकतो. ग्रंथ वाचणारी पिढीच विचार करणारा, संवेदनशील आणि विवेकशील समाज घडवू शकते. त्यामुळे ग्रंथालये ही विचारांना आकार देणारी ज्ञानप्रयोगशाळा असतात.
यावेळी राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य स्पष्ट करताना ग्रंथपाल प्रा. बबन कुंभार यांनी डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा प्रेरणादायी वेध घेतला. ते म्हणाले, डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालयाकडे केवळ पुस्तके संग्रहित करण्याचे ठिकाण म्हणून न पाहता ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविणारी गतिशील सामाजिक संस्था म्हणून पाहिले. ‘प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ आणि प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक’ या त्यांच्या विचारामध्ये ग्रंथालय चळवळीचे खरे तत्त्वज्ञान सामावलेले आहे.
यावेळी उपप्राचार्य डॉ. किशोर पवार, डॉ. मधुकर जडल, डॉ. अनिल कांबळे, महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
*फोटो ओळ: ग्रंथ प्रदर्शनाच्या भेटीप्रसंगी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थिनी*
*चौकटीतील मजकूर*
*ग्रंथांच्या सहवासातून ज्ञानसंस्कृतीचा जागर*
यावेळी आयोजित ग्रंथ प्रदर्शनात साहित्य, संस्कृती, इतिहास, तत्त्वज्ञान, चरित्र-आत्मचरित्रे, विज्ञान, समाजविज्ञान, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास आणि विविध ज्ञानशाखांतील समृद्ध ग्रंथसंपदा एकाच ठिकाणी पाहण्याची आणि नव्या पुस्तकांशी परिचय करून घेण्याची संधी विद्यार्थिनींना मिळाली. पुस्तकांच्या पानांपलीकडील ज्ञानविश्वाचा शोध घेण्याची जिज्ञासा जागविणारे हे प्रदर्शन वाचक आणि पुस्तक यांच्यात मैत्रीचा नवा सेतू उभारणारा ‘ज्ञानोत्सव’ ठरला.