सोलापूर – पूरग्रस्त परिस्थितीचा फटका बसलेल्या म्हैसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न आता काही अंशी मार्गी लागला आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, या उद्देशाने सेवा भारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, पुणे यांच्या सामाजिक उपक्रमातून शाळेसाठी नूतन स्वच्छतागृह उभारण्यात आले. या सुविधेचे लोकार्पण व हस्तांतरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंढरपूर जिल्हा संघचालक डॉ. रमेश सिद्ध यांच्या हस्ते करण्यात आले.
पूरग्रस्त शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसोबतच त्यांच्या दैनंदिन मूलभूत गरजांकडे लक्ष देण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित झाली. स्वच्छतागृहासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात शिक्षण घेता येणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल मुळे, माढ्याचे तहसीलदार संजय भोसले, गटविकास अधिकारी महेश सुळे आणि गटशिक्षणाधिकारी श्रीधर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सकारात्मक कार्यवाही करेल, अशी ग्वाही दिली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शाळेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही जैन यांनी सांगितले. सेवा भारतीचे सामाजिक व व्यवस्थापन प्रमुख सदानंद कुलकर्णी, सचिव प्रदीपजी स्वप्नील आणि सहसचिव प्रदीपजी देशपांडे यांनी उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.
यावेळी ग्रामपंचायत म्हैसगावचे सरपंच मुकुंद उबाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनुसिंह राजपूत, केंद्रप्रमुख प्रमोद खरटमल, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका कांदे यांनी केले, तर आभार केंद्रप्रमुख प्रमोद खरटमल यांनी मानले.
चौकट
शाळेची पाहणी; सुविधांबाबत समाधान
कार्यक्रमानंतर कुशल जैन यांनी संपूर्ण शाळेची पाहणी केली. त्यांनी वर्गखोल्या, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा, शालेय परिसर आणि वर्गातील शैक्षणिक सजावटीची पाहणी केली. शाळेतील स्वच्छता, आकर्षक वर्गसजावट आणि विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेले आनंददायी शैक्षणिक वातावरण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
कोट
विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसोबत दर्जेदार शिक्षण देणे हीच प्रशासनाची प्राथमिकता”
शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात शिक्षण घेता आले पाहिजे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. म्हैसगाव शाळेतील उर्वरित पायाभूत सुविधांच्या गरजांचाही सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. शाळेचा भौतिक विकास आणि शैक्षणिक गुणवत्ता या दोन्ही बाबींना जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्राधान्य दिले जाईल. यासाठी शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी प्रशासनासोबत समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.
– कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर
Post Views: 8