सोलापूर – राज्य शासनाने घर बांधण्यासाठी पैसे दिले; मात्र घरकुलाच्या कामाला सुरुवातच झाली नाही. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ४७ हजार ६०७ लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेतल्यानंतरही बांधकाम सुरू केलेले नसल्याचे समोर आले आहे. या लाभार्थ्यांच्या खात्यावर सुमारे ७० कोटी ५० लाख रुपये जमा झाले आहेत. निधी वितरित होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटत असतानाही घरकुलांची कामे रखडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
या परिस्थितीत आता लाभार्थ्यांच्या मागे निधीची अट लावण्यापेक्षा त्यांना घरकुलाचे काम सुरू करण्यासाठी गावपातळीवर समजावून सांगण्याची रणनीती प्रशासनाने आखली आहे. त्यासाठी १५ ते ३१ ऑगस्टदरम्यान ‘घरकुल पंधरवडा’ राबविला जात आहे. सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामीण विकास यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधणार आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २० हजार ३८० घरकुले पूर्ण झाली आहेत. मात्र, मोठ्या संख्येने लाभार्थी पहिल्या हप्त्यानंतरही पुढे न सरकल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे.
चौकट
सोलर सुविधेसाठीही अतिरिक्त आर्थिक तरतूद
घरकुलासाठी पहिला हप्ता १५ हजार रुपयांचा असतो. त्यानंतर पाया पूर्ण झाल्यावर ७० हजार, लेन्टनपर्यंत काम झाल्यावर ३० हजार आणि घराचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर आणखी ५ हजार रुपये मिळतात. सोलर सुविधेसाठीही अतिरिक्त आर्थिक मदत मिळण्याची तरतूद आहे. त्यामुळे पहिला हप्ता घेऊन काम थांबविणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील टप्प्यांचा निधी मिळवून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
कोट
प्रलंबित घरकुल योजना पूर्ण करण्यास पाठपुरावा
राज्य शासनाच्या घरकुल योजनेचा पहिला हप्ता घेतलेल्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम तातडीने सुरू करून पुढील हप्त्यांचा लाभ घ्यावा. प्रलंबित घरकुलांना गती देण्यासाठी गावपातळीवर विशेष पाठपुरावा सुरू आहे,” असे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांनी सांगितले.