सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील गट सचिवांच्या करण्यात आलेल्या बदल्या तात्काळ रद्द करण्याची मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पुणे येथील सहकारी संस्था विभागाच्या विभागीय सहनिबंधकांना पत्र देऊन या बदल्यांची चौकशी करून संबंधितांना आदेश देण्याची विनंती केली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील गट सचिवांच्या झालेल्या बदल्या प्रथमदर्शनी बेकायदेशीर असल्याचे दिसून येते. तसेच संबंधित गट सचिवांना बदलीचे आदेशही अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बदल्या जाणूनबुजून केल्या जात असल्याचे निदर्शनास येत असल्याचे देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.
यामध्ये तेलगाव विकास सोसायटीचे गट सचिव संपत बिराजदार, दिंडूर/होटगी विकास सोसायटीचे पीरासाहेब अमलीचुंगे आणि बाळगी/औज मंडळातील मंदुप विकास सोसायटीचे राजकुमार सगरे यांच्या बदल्यांचा समावेश आहे.
सदर गट सचिवांसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील इतर गट सचिवांच्या झालेल्या बदल्याही तात्काळ रद्द करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे.