टेंभुर्णी : मंडळ अधिकाऱ्याकडे तक्रार दिल्याच्या रागातून एका युवकावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आनंद थोरे (वय २६, रा. थोरेवस्ती, वरवडे, ता. माढा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बालाजी महादेव बारबोले (रा. थोरेवस्ती, वरवडे, ता. माढा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५१(२), ३५१(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेंभुर्णी पोलीसा कडून सविस्तर मिळालेली माहिती अशी की दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शेतातून डोक्यावर गवत घेऊन घरी जात असताना आरोपीने त्याला अडवून, “तू शेताबाबत मंडळ अधिकाऱ्याकडे माझ्याविरोधात तक्रार अर्ज का दिला?” असा जाब विचारला. त्यानंतर आरोपीने तेथेच पडलेला लोखंडी रॉड उचलून फिर्यादीच्या कानावर व हातावर मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे.
यावेळी आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत, “माझ्याविरोधातील तक्रार अर्ज मागे घे, अन्यथा तुला व तुझ्या आई-वडिलांना जिवंत सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.३७ वाजता टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९२/२०२६ दाखल करण्यात आला असून, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिंदे. पोलीस आदलिंगे पुढील तपास करीत आहेत
Post Views: 26