बार्शी – जिद्द, मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची इच्छाशक्ती असेल, तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही कोणत्याही स्पर्धा परीक्षेत आणि विविध क्षेत्रांत निश्चितपणे यश संपादन करु शकतात, याचा प्रेरणादायी प्रत्यय श्रीपतपिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभातून आला.
ज्ञानेश्वर मित्र मंडळ व श्रीपतपिंपरी ग्रामस्थांच्यावतीने गावातील गुणवंतांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सांगली व सातारा जिल्ह्यात शिक्षक म्हणून निवड झालेल्या संदीप घाडगे, स्नेहल घाडगे, रोहिणी जाधव व रुपालीताई लटके यांचा तसेच इन्फोसिस कंपनीमध्ये निवड झालेल्या केतन गोरे आणि कर्नाटक ग्रामीण बँकेत निवड विजय पवार व विजय लंकेश्वर महसूल सहाय्यकपदी निवड झालेल्या यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
ग्रामीण भागातील या युवकांनी अत्यंत खडतर परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कष्टांना कौतुकाची थाप मिळावी आणि गावातील विद्यार्थी, तरुण व पालकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांकडून गुणवंतांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी योग्य वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी अभ्यासिका सुरु करण्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील अनेक तरुणांनी या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देत सहमती दर्शवली. या अभ्यासिकेमुळे भविष्यात श्रीपतपिंपरीमधून अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सत्कार समारंभास लोकसेवा विद्यालयाचे शिक्षक
अरविंद चव्हाण सर, गावातील अमोल ताकवते (सहाय्यक आयुक्त, धाराशिव), गावचे सरपंच, रामराजे ताकभाते, उपसरपंच शाहूराजे घाडगे, लक्ष्मण घाडगे, भारत ताकभाते, मिठू घाडगे, डॉ. नाना ताकभाते, जिजाऊ गुरुकुलचे अध्यक्ष संभाजी घाडगे, सुनील गरदडे, बाळराजे पिंगळे, संकेत घाडगे, पोलीस बाळराजे घाडगे, दयानंद ताकभाते यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर मित्रमंडळाच्यावतीने शंकर घाडगे, निलेश काकडे, अतुल काकडे, सुजित कदम, हरिभाऊ घाडगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पारस कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन बाळराजे पिंगळे यांनी केले.
Post Views: 8