मोहोळ : तालुक्यातील घोडेश्वर येथील काकडे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हा परिषद सदस्य तथा जकराया कारखान्याचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून शाळेच्या परिसरात बोअर पाडून दिल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
काकडे वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पाण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांना शेतामध्ये विविध ठिकाणी भटकंती करावी लागत होती. याबाबत वेळोवेळी शिक्षक व पालकांकडून स्थानिक पातळीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शाळेतील पाणीप्रश्नासाठी पालकांची बैठकही घेण्यात आली होती.
यावेळी पालक व शिक्षकांनी कुरुल जिल्हा परिषद गटाचे सदस्य तथा जकराया कारखान्याचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्याकडे पाणीप्रश्न मांडला. विद्यार्थ्यांचा प्रश्न समजताच जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वखर्चातून शाळेच्या परिसरात बोअर पाडून देण्याचे आश्वासन दिले.
त्यानुसार दि. २५ ऑगस्ट रोजी बोअर पाडण्याचे काम सुरू करण्यात आले.बोअरला पाणी लागल्याने काकडे वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली आहे. याबद्दल पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी सचिन जाधव यांचे आभार मानले.
यावेळी युवा उद्योजक सादिक तांबोळी, सय्यद शेख, सरदार तांबोळी, पांडुरंग सरवळे, जावेद शेख, दीपक माने,औदुंबर ताकमोगे , डॉ. प्रसाद काकडे, अमर सरवळे, विजयकुमार स्वामी, सुमित काकडे, शेखर चांडोले, गुंडोपंत पाटील, निलेश जाधव, उदयसिंह कावळे, पंचाक्षरी स्वामी, यांच्यासह ग्रामस्थ, पालक व शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देत तातडीने केलेल्या या कामाचे परिसरातून कौतुक होत आहे.
Post Views: 3