पिलीव – महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य सर्वश्रुत आहे. परंतु, महात्मा फुलेंनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथातून केलेली अनमोल धर्मचिकित्सा दुर्दैवाने लोकांपर्यंत पोहोचवली गेली नाही, असे प्रतिपादन माजी प्राचार्य शिवाजीराव राऊत यांनी केले.
पिलीव (ता. माळशिरस) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘दैनिक पंढरी भूषण’चे संपादक शिवाजीराव शिंदे होते.
व्यासपीठावर पंचायत समितीच्या उपसभापती मनीषा मदने-पाटील, माजी जि. प. सदस्य गणेश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रा.संजय पाटील, प्राचार्य अशोक बागल, पर्यवेक्षक मासाळ,संजय मोहिते व पत्रकार शाहरुख मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
*विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी फुलेंच्या पुस्तकातील प्रकल्प द्यावेत*
पुढे बोलताना प्राचार्य शिवाजीराव राऊत म्हणाले की, ऊन-सावलीच्या लपंडावाप्रमाणेच ज्ञान आणि अज्ञानाचाही लपंडाव सुरू असतो. महात्मा फुलेंच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होत असताना, या काळात त्यांच्या शिक्षणाचे आणि सत्यशोधक समाजाच्या विचारांचे काय झाले, याचा विचार करण्याची गरज आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हाच वारसा पुढे चालवला. येथील विद्यार्थी कर्मवीरांच्या स्वप्नातील ‘सत्यशोधक मुले’ असून ते ज्योतिबा व सावित्रीबाईंचे खरे वारसदार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये हे विचार रुजवण्यासाठी महात्मा फुलेंच्या पुस्तकांतील विविध घटकांवर आधारित अभ्यासक्रम व प्रकल्प त्यांना देण्यात यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
प्रस्ताविकात प्राचार्य अशोक बागल यांनी महात्मा फुलेंच्या लेखणी आणि कृतीतील संघर्षाचा उल्लेख केला. आज आपण आधुनिक युगात प्रवेश केला असला,तरी शिक्षण आणि स्त्री-पुरुष समानतेसाठी महात्मा फुलेंच्या विचारांची आजही तितकीच गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
*मोबाईलच्या गैरवापरावर शिक्षकांनी बंदी घालावी: शिवाजीराव शिंदे*
अध्यक्षीय भाषणात शिवाजीराव शिंदे म्हणाले की, आज आपण जी प्रगती पाहत आहोत ती फुले दाम्पत्याच्या शिक्षणकार्यामुळेच शक्य झाली आहे. तत्कालीन सामाजिक विरोधाला झुगारून त्यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशीच स्पर्धा करावी, तरच यश मिळते. आजच्या सोशल मीडियाच्या युगात मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुण पिढीवर, विशेषतः ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर योग्य ते नियंत्रण व बंदी घालावी, तरच विद्यार्थी भविष्यात यशस्वी होतील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर झाडे, प्रवीण मेटकरी यांनी केले तर आभार सत्यवान वाघमारे यांनी मानले.
चौकट:
*घोषणांनी परिसर दुमदुमला*
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी “सार्वजनिक सत्यधर्माचा विजय असो…”, “सावित्रीच्या आम्ही लेकी…” आणि “ज्योतिबाचे आम्ही वारसदार…” अशा उत्स्फूर्त घोषणा दिल्या. यावरून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांवर असणारा दृढ प्रभाव स्पष्टपणे दिसून आला.
Post Views: 13