सोलापूर – कर्तव्यावर असताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले, वाढती असुरक्षितता आणि मानसिक त्रास या विरोधात ‘महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन सोलापूर’च्या वतीने मंगळवार १ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी मूक मोर्चा’ काढण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे १७ ऑगस्ट रोजी ग्रामसभेत शासकीय काम करत असताना ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर अमानुष हल्ला झाला. या मानसिक व शारीरिक त्रासामुळे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे, ग्रामपंचायतच्या दरवर्षी होणाऱ्या दहा ते बारा ग्रामसभा रद्द करून वर्षातून केवळ एकच आर्थिक नियोजन व आढावा ग्रामसभा आयोजित करण्यात यावी अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.
या मूक मोर्चामध्ये युनियनचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष शरद भुजबळ, मानद अध्यक्ष सुशेन ननवरे, कार्याध्यक्ष नारायण ढवळे, सरचिटणीस दयानंद पाटील यांसह जिल्ह्यातील बहुसंख्या ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनास जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेचे संघटनेच्या वतीने राजेश देशपांडे यांनी पाठिंबा जाहीर केला.
चौकट
ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या या आहेत मागण्या
पी. एन. पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. वर्षातून वारंवार होणाऱ्या १०-१२ ग्रामसभांऐवजी वर्षातून केवळ एकच आर्थिक व आढावा ग्रामसभा ठेवावी. ग्रामसभेत अनधिकृत व्हिडिओ चित्रीकरण व सोशल मीडियावर होणाऱ्या बदनामीवर कायदेशीर बंदी घालावी. संवेदनशील ग्रामसभांसाठी विनामूल्य पोलीस बंदोबस्त मिळावा, इतर विभागांच्या विशेष ग्रामसभांची जबाबदारी संबंधित विभागांवरच सोपविण्यात यावी . वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या लाभार्थी निवडीची प्रक्रिया तालुका स्तरावरून पारदर्शकपणे व्हावी.