सोलापूर : भाजप प्रदेशाच्या वतीने महापालिकेतील नगरसेवकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, सर्व नगरसेवकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सर्व नगरसेवकांना अनिवार्य करण्यात आल्याची माहिती सोलापूर महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी दिली.
पुणे येथे नुकत्याच झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती सोलापूरमधील नगरसेवकांना देण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी नगरसेवकांच्या प्रशिक्षणाबाबतचा निर्णयही जाहीर करण्यात आला.
त्यानुसार, ६ आणि ७ सप्टेंबर रोजी ठाणे येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी सर्व नगरसेवकांनी ५ सप्टेंबर रोजीच प्रशिक्षणस्थळी मुक्कामी दाखल व्हायचे आहे. त्यानंतर ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्गांना सुरुवात होणार आहे.
या प्रशिक्षण शिबिरात केवळ सोलापूर महापालिकेतील नगरसेवकच नव्हे, तर आणखी तीन महापालिकांतील भाजप नगरसेवक सहभागी होणार आहेत. एकूण सुमारे २०० नगरसेवकांचा प्रशिक्षण वर्ग होणार असून, त्यामध्ये सोलापूर महापालिकेतील ९६ नगरसेवकांचा समावेश असणार आहे. उर्वरित नगरसेवक अन्य तीन महापालिकांमधील असतील.नगरसेवकांना स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज, सभागृहातील भूमिका, विकासकामांचे नियोजन, जनतेशी संवाद आणि पक्षाची धोरणे यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे.
भाजपच्या नगरसेवकांना संघटनात्मक आणि प्रशासकीय कामकाजाचे धडे देण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार असून, आगामी काळातील महापालिकेतील कामकाजासाठीही या शिबिराची दिशा निश्चित करणारी भूमिका राहणार आहे..
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्षांनी या प्रशिक्षणाबाबत स्पष्ट सूचना दिल्या असून, प्रत्येक नगरसेवकाची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये, अशा सूचना प्रदेश स्तरावरून देण्यात आल्याचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सांगितले.
Post Views: 16