धाराशिव : यावर्षी धाराशिव जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांसह खरीप पिके सुकून व करपून गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हतबल झाला असून शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील धरणे व तलावांमधील पाणीसाठा कमी होत असून अनेक ठिकाणी विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये अद्याप टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
पावसाने सुरुवातीपासूनच उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पादन हातातून गेल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा व आर्थिक संकटाचा मोठा भार पडला असून शासनाने तातडीने ठोस मदत करणे आवश्यक असल्याचे रिपब्लिकन सेनेने म्हटले आहे.
१.धाराशिव जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा.
२.संबंधित यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत.
३.सन २०२६ च्या पीक विम्यासोबत पीक नुकसानभरपाई देण्यात यावी.
४.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यात यावी.
५.पिण्याचे पाणी तसेच जनावरांसाठी तातडीने पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
शासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करावी आणि संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने आर्थिक मदत व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली.
Post Views: 12