सांगोला – सांगोल्यातील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन संस्थाध्यक्ष बाबुराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष इंजि.महादेव गायकवाड, सचिव अंकुश गायकवाड व प्राचार्य डॉ.रणजित देशमुख उपस्थित होते. प्रस्तावनेमध्ये डॉ.रणजित देशमुख यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करत मागील पंधरा वर्षांतील कॉलेजचा लेखाजोखा मांडला. त्यांनी ‘टेकउत्सव’, ‘स्पंदन’ व ‘कुरुक्षेत्र’ या वार्षिक उपक्रमांची ओळख करून देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी कॉलेजमधील तक्रार निवारण समिती, अँटी रॅगिंग समिती, इंटरनल कंप्लेंट कमिटी यांची माहिती दिली. यावेळी प्रियांका देवकर, प्रगती वाघ, ऐश्वर्या यादव, सायली वाघमारे व संदीप केदार या नव प्रवेशित विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.संदीप बावचे यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ चांगले गुण मिळवणे पुरेसे नसून प्रत्यक्ष काम करताना उपयोगी पडणारे ज्ञान, कौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता आणि आत्मविश्वास विकसित करणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले. इंजि.महादेव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने पालकांचे, समाजाचे आणि कॉलेजचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन करत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी आणि यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नयेत असा मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा.पोपट पवार यांनी केले. यावेळी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.