सोलापूर : शिक्षक दिन केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरता मर्यादित न ठेवता ‘भूमिका अनुभवातून समजून घेण्याचा दिवस’ बनविण्यासाठी सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात ‘वन डे टीचर अँड प्रिन्सिपल’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. शिक्षक होण्याचा केवळ आनंदच नव्हे, तर त्या भूमिकेमागील जबाबदारी, संयम आणि संवेदनशीलताही विद्यार्थिनींनी दिवसभर प्रत्यक्ष अनुभवली.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयातील दिवसभराचे अध्यापन ‘एक दिवसीय शिक्षकां’नी केले. महाविद्यालयाच्या दैनंदिन प्रशासनाचीही सूत्रे विद्यार्थिनींकडे सोपविण्यात आली. ज्ञानदा येऊलकर यांनी एक दिवसाच्या प्राचार्य, तर शारदा बुक्या यांनी उपप्राचार्य म्हणून जबाबदारी पार पाडली.
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील शिक्षकांसाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करत महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. यावेळी अश्विनी मुळे, शारदा राठोड, साक्षी जवळकोटे, राजेश्वरी नुला, पद्मश्री व्हनमाने, सविता जाधव, अपर्णा देशमुख, पायल शिंदे, साक्षी काळे, भावना शेळके आणि अक्षरा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रम शिकविला नाही, तर आत्मविश्वास दिला, चुका सुधारण्याची संधी दिली आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी घडविली, अशा भावना विद्यार्थिनींच्या मनोगतातून व्यक्त झाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैष्णवी गुल्लोली यांनी केले. ज्ञानदा येऊलकर यांनी सूत्रसंचालन केले, तर समरीन पठाण यांनी आभार मानले.
चौकट
बैठकीत रंगली ‘झेन जी’ची चर्चा
‘वन डे टीचर अँड प्रिन्सिपल’ उपक्रमांतर्गत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचा प्रश्न चर्चेला आला आणि त्यातून संवाद थेट ‘झेन जी’च्या मानसिकतेपर्यंत पोहोचला. नव्या पिढीच्या अपेक्षा, शिक्षणाकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन आणि महाविद्यालयातील उपस्थिती यावर एक दिवसीय गुरुजींनी आपली मते मांडली. त्याचबरोबर सुरक्षित वाहतूक, ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या दैनंदिन प्रवासातील समस्या यांचाही ऊहापोह झाला. अनुपस्थितीकडे केवळ शिस्तीचा प्रश्न म्हणून न पाहता त्यामागील सामाजिक, मानसिक आणि भौगोलिक कारणेही समजून घेतली पाहिजेत, असा सूर चर्चेतून पुढे आला. विशेष म्हणजे विद्यार्थिनीच प्रशासनाच्या भूमिकेत असल्यामुळे ‘झेन जीने झेन जीच्याच प्रश्नांकडे प्रशासनाच्या नजरेतून पाहण्याचा’ हा संवाद या बैठकीचे वेगळेपण ठरला.


















