दरवर्षीप्रमाणे यंदाही अरिहंतच्या प्रांगणात दहीहंडी कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीचे खास वैशिष्ट्य म्हणजे शाळेच्या प्रांगणात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वृंदावन देखावा व बाळगोपाळांचा श्रीकृष्णाच्या बाललीला यांची सजावट करण्यात आली होती.गोविंदा रे गोपाळा चा गजर व बाळगोपाळांचा उत्साह यामुळे वातावरण पूर्णपणे कृष्णमय झाले होते. काही विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा व गोपिका यांची वेशभूषा धारण केली होती. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. सोनाली जाधव व सोलापुरातील आंतरराष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू श्वेता मालप उपस्थित होत्या. तत्पूर्वी पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून प्रसाद चढवण्यात आला. यावेळी मंचावर संचालिका सौ. सुलक्षणा पोन्नम, रामकृष्ण पोन्नम, उपमुख्याध्यापिका तस्मिन शेख, पर्यवेक्षिका अर्चना महांकाळ उपस्थित होत्या. यानंतर वसंत नाईक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुलक्षणा पोन्नम यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कु. रुश्वी पारशी हिने श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनाचे महत्त्व विशद केले. प्रमुख पाहुण्यांनी श्रीकृष्णांनी केलेले उपदेश व त्याचे महत्त्व व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. यानंतर इ. ७ वीच्या विद्यार्थिनींनी श्रीकृष्ण लीला गाण्यावरती बहारदार नृत्य सादर केले. यानंतर गोविंदा रे गोपाळा व हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की म्हणत इ. दहावीच्या विद्यार्थ्यांनी तीन थर रचत, पाण्याच्या वर्षावात उत्साहात दहीहंडी फोडली. दहीहंडी फोडताच सर्वांनी एकच जल्लोष केला. यानंतर सर्वांना प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Post Views: 20