सोलापूर – आजच्या काळात शिक्षकांपुढे बरीच आव्हाने असून संपन्न समाज घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे.उच्च पदस्थ गेलेल्या विद्यार्थ्यांची कोणत्याही परिस्थितीत समाजाशी नाळ जोडून ठेवण्याचे संस्कार शिक्षकांनी करावे, अशी अपेक्षा दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक तथा माजी प्राचार्य डॉ. विजयकुमार उबाळे यांनी व्यक्त केली.
येथील बसवेश्वर विचार मंचच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
बलिदान चौक येथील जैन स्थानकात परमपूज्य अक्षयश्रीजी, मल्लीश्रीजी, विभवश्रीजी, संयमश्रीजी महाराज यांच्या मंगल सानिध्यात आयोजित या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक तथा माजी प्राचार्य डॉ.विजयकुमार उबाळे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते,डॉ.संध्या रघोजी, मनीषा पाटील, निर्मला भोसले, जैन स्थानकवासी संघाचे अध्यक्ष पदम राका,ट्रस्टी गौतमचंद संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा.प्रशांत शिंपी, संगीता पाटील,सौ.लता सूर्यवंशी-कांबळे,संतोषी जाधव,पल्लवी दोड्डी, पुनम कटकधोंड, योगिता पवार, सुजाता खेडगीकर, गौरी देशमुखे-उपासे, बाबागौडा बिराजदार, उमेश युवनाती, कृष्णकांत उपाध्ये,विरेश थळंगे, सुषमा वाघमोडे, भाऊसाहेब भोसले, शीला हावळे, व्ही.आर गवळी, नौशाद सोफी, चंद्रकांत आदलिंगे, प्रा.प्रसन्न नाझरे, खाशेराव ढोले, प्रमोद कुनगुलवार, डॉ.अंजली शिरसी या शिक्षकांसह सलीम पटेल, सचिन सोनवणे या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही पुरस्कार देऊन रंजीता चाकोते यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. याच समारंभात लोकमंगल माध्यमिक प्रशाला, श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला, गांधीनाथा रंगजी मराठी प्राथमिक विभाग,श्री वीर तपस्वी बालक मंदिर मराठी प्राथमिक शाळा भवानी पेठ, चांदतारा उर्दू प्रायमरी स्कूल या शाळांचा उपक्रमशील शाळा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना सौ.रंजीता चाकोते म्हणाल्या,शिक्षकांनी समर्पणाच्या भावनेने ज्ञानदानाचे कार्य करावे.आजचा विद्यार्थी कोणत्या दिशेने चालला आहे याचाही सखोल अभ्यास करावा. आज शिक्षकांचे काम हे आव्हानात्मक बनलेले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वप्न दाखवावे सोबतच ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी सक्षम विद्यार्थी घडवावेत.
प्रारंभी गौतमचंद संचेती यांनी प्रास्तावित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय खंडेराव यांनी केले तर उपस्थितांचे आभार इंदू किणगी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मल्लेश पुरवंत,शैलजा पुरवंत, नागेश्वरी भागानगरे, सुचित्रा नागलीकर यांनी परिश्रम घेतले.