सोलापूर – शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा आणि समाजाच्या भविष्याची जडणघडण करणारा समाजाचा शिल्पकार आहे, असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक एम. ए. शेख यांनी केले.
मागास समाज सेवा मंडळ, नेहरूनगर, सोलापूर यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त श्री. शिवाजी अध्यापक विद्यालयातील श्री. चंद्राम चव्हाण गुरुजी सांस्कृतिक भवनात शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अध्यक्ष म्हणून एम. ए. शेख उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात मार्शल स्टॅलिन व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांचे जीवनातील महत्त्व, शिक्षकांचे संस्कार आणि समाज घडविण्यात शिक्षकांची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी दुसरे प्रमुख वक्ते स्वामीनाथ कलशेट्टी यांनी बदलत्या काळानुसार शिक्षकांनी स्वतःला सातत्याने अपडेट केले पाहिजे, नवीन तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे आणि आधुनिक शिक्षणपद्धती आत्मसात करून विद्यार्थ्यांना काळानुरूप ज्ञान दिले पाहिजे, असे सांगितले. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे उपस्थित शिक्षकांना नवी प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सैनिक शाळेतर्फे शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.
या कार्यक्रमास संस्थेचे सर्व शाखाप्रमुख, विविध शाखांचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना नागणे यांनी केले, वनिता नेवसे यांनी आभार मानले.
Post Views: 15