टेंभुर्णी – केदारनाथ धाम यात्रेदरम्यान गौरीकुंड-केदारनाथ पायी मार्गावर डोंगरावरून अचानक दगड कोसळल्याने माढा तालुक्यातील निमगाव टें येथील मंगल अप्पाराव शिंदे (वय ६०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (६ सप्टेंबर) चीरबासा हेलिपॅडजवळ ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मंगल शिंदे यांना तातडीने गौरीकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. माढा तालुक्यातील महिलेचा केदारनाथ यात्रेदरम्यान झालेल्या या दुर्दैवी घटनेने निमगाव टें परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या दुर्घटनेची माहिती देऊन केदारनाथ येथील प्रशासनाशी तातडीने संपर्क साधून आवश्यक आदेश देण्याची विनंती केली. मंगल शिंदे यांना घटनास्थळावरून सुरक्षितपणे आणण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी बबनदादा शिंदे यांनी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत प्रयत्न केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ, डीडीआरएफ आणि पोलिसांच्या बचाव पथकांनी चीरबासा हेलिपॅड परिसरात धाव घेतली. जखमी मंगल शिंदे यांना गौरीकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाकडून पंचनामा व आवश्यक वैधानिक कार्यवाही करण्यात आली असून घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. आज निमगाव टें येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात आला
Post Views: 11