सोलापूर : लोकप्रतिनिधी म्हणून प्रभावी कामकाज, संघटनात्मक शिस्त आणि जनतेशी सातत्यपूर्ण संवाद यांचे धडे घेत भाजपच्या नगरसेवकांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे उत्साहात समारोप झाला. ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत सोलापूरसह विविध महानगरपालिकांतील भाजप नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय सह महामंत्री (संगठन) शिवप्रकाश यांनी नगरसेवकांना संघटन, लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आणि पक्षाच्या विचारधारेनुसार काम करण्याबाबत मार्गदर्शन केले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचा समारोप झाला.भाजपचे प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे यांनी जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे, असे सांगितले. यावेळी आ. देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासह पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
आगामी ‘व्हिजन २०४७’ डोळ्यासमोर ठेवून शहराच्या दीर्घकालीन विकासाचे नियोजन करण्यावर प्रशिक्षणात भर देण्यात आला. विकास आराखड्याच्या आधारे नियोजनबद्ध शहरविकास साधण्याची गरज व्यक्त करण्यात आली.मुंबई महापालिकेचे सभागृह नेते गणेश खामकर यांनी सभागृहातील नगरसेवकांची भूमिका, कामकाजाचे नियम आणि विकासकेंद्री चर्चेचे महत्त्व स्पष्ट केले. दोन दिवसांत महापालिका प्रशासन, सभागृहाचे कामकाज, संघटनात्मक जबाबदारी आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षित नगरसेवकांतून
प्रभावी नेतृत्व घडेल : नरेंद्र काळे
दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा नगरसेवकांना आगामी काळात निश्चितच मोठा फायदा होणार आहे. नेतृत्व तयार होत असताना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर पुढील कामकाजासाठी त्यांना प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन भाजपने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. प्रशिक्षणातून मिळालेल्या मार्गदर्शनाचा उपयोग नगरसेवकांच्या प्रत्यक्ष कामातून निश्चितच दिसून येईल. जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करताना या प्रशिक्षणाचा सकारात्मक परिणाम जाणवेल, असा विश्वास सोलापूर महापालिका सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी व्यक्त केला.
Post Views: 5