बार्शी – आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने बार्शी शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ५६ अन्वये चार सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, त्यांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांच्या हद्दीतून निर्धारित कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी संबंधित इसमांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ अन्वये तडीपारीचे प्रस्ताव सादर केले होते. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सक्षम प्राधिकरणाने संबंधित इसमांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांच्या हद्दीतून निर्धारित कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले.
तडीपार करण्यात आलेल्या इसमांमध्ये तुषार राजेंद्र जंगम (रा. वाणी प्लॉट, बार्शी)– ६ महिने, विशाल दगडू मांगडे (रा. तुळजापूर रोड, मांगडे चाळ, बार्शी)– ६ महिने, वैभव कैलास काकडे (रा. अण्णाभाऊ साठे नगर, सुलाखे हायस्कूल रोड, बार्शी)– ६ महिने आणि बायडा अमर लखपती (रा. पतंगे प्लॉट, अलीपूर रोड,
बार्शी)– ३ महिने यांचा समावेश आहे.
सदर इसमांविरुद्ध मारामारी, बेकायदेशीर जमाव, दंगल, दुखापत करणे तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे यासारख्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या उपद्रवी कृत्यांमुळे सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
तडीपारीच्या कालावधीत संबंधित इसम सोलापूर किंवा धाराशिव जिल्ह्यांच्या हद्दीत विनापरवाना आढळून आल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Post Views: 12