बार्शी – येथील पेशवे कालीन ऐतिहासिक श्री गोपाळकृष्ण मंदिरात पानसे परिवाराच्यावतीने आयोजित श्री गोपाळकृष्ण जन्माष्टमी सप्ताह भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. आठ दिवस चाललेल्या या सप्ताहात अभिषेक, पूजा, हरिपाठ, भजन, कीर्तन, वीणा सेवा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सप्ताहात ह.भ.प. श्रेयस बडवे महाराज, मयुरेश केळकर महाराज, सुयोग केसरकर महाराज, प्रसादबुवा रामदासी महाराज आणि श्रीरामबुवा महाराज यांच्या कीर्तनसेवेने भाविकांना भक्ती व संस्कारांचा संदेश मिळाला. विविध भजनी मंडळांनी सादर केलेल्या भजनांनी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
जन्माष्टमीच्या दिवशी पहाटेपासून अभिषेक, पूजा, सजावट व धार्मिक कार्यक्रम सुरु होते. रात्री जन्मकाळाच्या अभिषेकानंतर कीर्तन, कृष्णजन्माचा जयघोष, पाळणा, आरती व प्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी पानगाव तसेच परिसरातील सुमारे २०० ते २५० भाविक उपस्थित होते.
यावेळी दीर्घकाळ भक्ती व संतसेवा करणारे नंदूमहाराज रणशूर यांचा पानसे परिवाराच्यावतीने ‘निसीम भक्तिमार्ग जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. श्री विनायक पानसे व सौ. रेखा पानसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर राघवेंद्र महाराज यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
श्री गोपाळकृष्ण मंदिरातील या आठवडाभराच्या भक्तिमय सोहळ्यामुळे पानगाव परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले.
Post Views: 15