श्रीपूर – बैल पोळा सणासाठी श्रीपूर मध्ये व्यापारी वर्गाची बैलांना सजवण्यासाठी आकर्षक साहित्यानी दुकाने सजली आहेत . यात वैशिष्टपूर्ण दुकानदार म्हणजे गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून अविरत सुरु असलेले शरद तिवाटणे यांचे दुकान. बैल पोळा सण तीन दिवसांवर आला आहे सध्या खरेदीसाठी अद्याप म्हणावा तसा शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने बाजारपेठेत अद्याप शुकशुकाट जाणवत आहे .या बद्दल माहिती देताना दुकानदार शरद तिवाटणे म्हणाले की या वर्षी पाच ते दहा टक्के प्रत्येक मालावर दरवाढ झाली आहे . आपल्या कडे असलेल्या पाळीव जनावरांना सजविण्यासाठी ते आवर्जुन अडचणी दूर सारून बैल पोळा सण साजरा करतातच हा आज पर्यंतचा अनुभव आहे .यात बैलांच्या गळ्यात घुंगराच्या चंगाळी, गंडे , म्होरक्या, दावे, पायातील रंगीत गोंडे , आकर्षक रंगसंगतीच्या झुली , रिबीन , या वस्तूंचा समावेश आहे . या सामानाच्या खरेदी साठी बोरगाव, माळखांबी , मिरे , नेवरे , महाळुंग , उंबरे , तसेच पंढरपूर तालुक्यातील करोळे, पेहे , नांदोरे , या भागातील शेतकर्यांना श्रीपुरची बाजार पेठ सोयीची आहे . सध्या यांत्रिक पद्धतीने शेती करण्याचा कल वाढला आहे . ट्रॅक्टर, यांत्रिक औजारे , यांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचा कल वाढला आहे . त्यामुळे बैलगाडी बैलजोड्या यांची संख्या कमी होत आहे . याचा परिणाम खरिदेवर जाणवतो असे तिवाटणे यांचे म्हणणे आहे . याबरोबरच श्रीपूर मध्ये संतोष खंकाळ , दिलिप गुळुमकर, रमेश डांगे, पिंन्टू खंकाळ यांचीही दुकाने सजली आहेत . सामानाच्या वस्तूं मध्ये भाव वाढ झाली असली तरीही अशाही परिस्थितित अनेक भागात बैलजोड्या गायी म्हशी यांच्या भव्य मिरवणुका पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढल्या जातात .
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – .. . . . . .. . .. . पावसाचे सावट . . . . . . . . . . .
या परिसराचा विचार करता साखर कारखाने व उजनी व वीर धरणाचे पाणलोट क्षेत्र असल्याने ऊस पिकाचे क्षेत्र जास्त आहे . या परिसरात सरासरी २० ते २२ इंच ( पर ५०० ते ५५०) पाऊस पडतो परंतू आता अर्धा सप्टेंबर महिना होऊनही एकही समाधानकारक पाऊस पडला नाही . आज पर्यंत कसा बसा ४ इंच ( १०० मी. मी .) पाऊस पडला आहे . तोही धड ओठाला ना पोटाला अशा म्हणी प्रमाणे पडला याचा मोठा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला असून पोळा सणावर निसर्गाच्या अवकृपेचे सावट पडलेले आहे .
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –





















