माढा : सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने धनगर समाजाच्या प्रलंबित व न्याय्य हक्कांच्या चार प्रमुख मागण्यांसाठी आज माढा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. शासनाने केवळ आश्वासने आणि बैठका न घेता या मागण्यांवर तातडीने ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
धनगर समाजाच्या चार प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे –
१. धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाबाबत शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आवश्यक प्रतिज्ञापत्र तातडीने दाखल करावे.
२. पुणे-मुंबई मिसिंग लिंकला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्यावे.
३. संत बाळूमामा देवालयाच्या विश्वस्त मंडळामध्ये धनगर समाजातील पात्र व योग्य प्रतिनिधींना विश्वस्त म्हणून सामावून घ्यावे.
४. मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे.
धनगर समाजाच्या या मागण्या केवळ भावनिक नसून त्या समाजाच्या हक्क, अस्मिता आणि प्रतिनिधित्वाशी निगडित आहेत. त्यामुळे शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका सकल धनगर समाजाच्या वतीने मांडण्यात आली.
माढा तहसील कार्यालयाकडून हे निवेदन संबंधित शासन विभागांकडे तातडीने पाठविण्यात यावे आणि त्यावर झालेल्या कार्यवाहीची लेखी माहिती समाजाला देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना इशारा देण्यात आला की, “धनगर समाज शांत आहे; मात्र अन्याय सहन करणारा नाही. मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास लोकशाही व संवैधानिक मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
निवेदन देताना माढा तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव उपस्थित होते.