सोलापूर – पावसाने मोठी ओढ दिल्याने सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगाम अडचणीत आला असून, शेतकऱ्यांसमोरील संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अनेक भागांत पिकांना पुरेसा पाऊस मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने केली.
यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत खरीप हंगामाची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण आणि पिकांवरील परिणाम यावर सविस्तर चर्चा झाली. पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असल्याने प्रशासनाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असा निर्णय घेण्यात आला.
चौकट
पीकविमा आणि नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा
पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याची अग्रिम रक्कम मिळावी, तसेच शासनाकडून नुकसानभरपाई मंजूर करण्यासाठी प्रस्ताव पाठवून त्याचा सातत्याने पाठपुरावा करावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. पिके वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत असले तरी पावसाची आवश्यकता कायम असल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज सदस्यांनी व्यक्त केली. त्याच प्रकारे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.
चौकट
विकासकामांच्या प्रगतीचाही आढावा
बैठकीत विविध विभागांच्या विकासकामांची प्रगती, जिल्हा ग्रामविकास निधीची स्थिती आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जमा-खर्चाचा आढावा घेण्यात आला. मागील बैठकीच्या कार्यवृत्तास मंजुरी देण्याबरोबरच विविध शासन निर्णय, परिपत्रके आणि विषय समित्यांच्या कार्यवृत्तांवर चर्चा करण्यात आली.
Post Views: 19