बार्शी – शेतकऱ्याचा जिवाभावाचा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण बार्शीत दुष्काळाच्या सावटाखाली पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त १८९१ मध्ये स्थापन झालेल्या श्री बार्शी गोरक्षण मंडळातील गायी, बैल व कालवडींची शहरातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. जनावरांच्या शिंगांना आकर्षक रंगरंगोटी, फुलांची सजावट करून तसेच खांद्यावर झुलीचा साज चढवून त्यांना सजविण्यात आले होते.
गोरक्षण मंडळाचा कारभार आतापर्यंत भाटे, कथले, सुलाखे, झाडबुके, सोपल, मनगिरे, वाळके, मालू, कुंकूलोळ, चंडक, शहा, सोमाणी आणि गलांडे या कुटुंबांतील व्यक्तींनी सांभाळला आहे. गोरक्षण मंडळात सध्या १२ दुभत्या गायी, ४ गाभण गायी, १०६ भाकड गायी, २० कालवडी, ४९ खोंड, ५ बैल, २ वळू आणि सहा महिन्यांपर्यंतच्या ३० लहान कालवडी आहेत.
अडीच वर्षांपेक्षा अधिक वयाच्या गायी व कालवडींसाठी शासनाकडून प्रति जनावर दररोज ५० रुपये मिळतात. मात्र प्रत्यक्षात चारा, पाणी व इतर खर्च मिळून एका जनावरासाठी १४० रुपये खर्च येतो. उर्वरित खर्च देणगी, तसेच शेण व गोमूत्र विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून भागविला जातो, अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब आडके यांनी दिली.
Post Views: 23