अक्कलकोट – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी आज सहकुटुंब श्री क्षेत्र अक्कलकोट येथे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन
श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले.
यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांनी महापौर रवी लांडगे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद आणि श्री स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी सत्कारा प्रित्यर्थ बोलताना महापौर रवी लांडगे यांनी मंदिरातील बदलाबाबत सकारात्मक मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना महापौर रवी लांडगे म्हणाले की आज सहपरिवार स्वामींचे दर्शन घेऊन मनाला खूप समाधान मिळाले, हा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय आहे.मी यापूर्वीही अनेकदा अक्कलकोटला आलो आहे, पण यावेळी मंदिरात जो बदल झालेला पाहतोय तो खरोखरच डोळ्यात भरणारा आहे. चेअरमन महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मंदिर समितीने मंदिराचा
जो कायापालट केला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे. मंदिर परिसरातील स्वच्छता पाहून असे वाटते की आपण एखाद्या स्वर्गासमान मंदिरात आलो आहोत इतकी सुंदर व्यवस्था आहे. भाविकांसाठी दर्शन रांगेचे नियोजन त्यासाठी असलेले शेड, पिण्याच्या पाण्याची सोय अतिशय उत्तम आहे.
भक्त निवासाची व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आली असून बाहेरून येणाऱ्या भाविकांना याचा मोठा फायदा होत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात आणि परिसरात जे सुशोभीकरण करण्यात आले आहे त्यामुळे मंदिराच्या वैभवात आणखी भर पडली आहे. सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था आणि सेवेकऱ्यांचे भाविकांशी असलेले वर्तन
हे खूप आपुलकीचे आहे. एक महापौर म्हणून मी सांगू इच्छितो की, एवढ्या मोठ्या देवस्थानचा कारभार इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने चालवणे हे सोपे नाही.
महेश इंगळे आणि त्यांची संपूर्ण टीम जी मेहनत घेत आहे ती खरोखरच वंदनीय आहे. आमच्या पिंपरी चिंचवड शहरातून हजारो भाविक येथे येतात, त्यांच्या तोंडून मी नेहमी येथील व्यवस्थेचे कौतुक ऐकतो. आज स्वतः ते अनुभवायला मिळाले याचा आनंद आहे. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद असाच आमच्या कुटुंबावर आणि सर्व भाविकांवर राहो.
पुन्हा लवकरच स्वामींच्या दर्शनाला येईन असे मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, लांडगे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता.
Post Views: 15