मंगळवेढा – मंगळवेढा एमआयडीसी परिसरात भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत यांच्या पुढाकारातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटरचे भव्य उद्घाटन आज अनिल सावंत यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
या उद्घाटन समारंभास पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील दूध डेअरीचे चेअरमन, दूध उत्पादक शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे म्हणाले, “अनिल सावंत यांनी आतापर्यंत भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून या भागात मोठा उद्योग उभा केला आहे. आता त्यांनी दूध व्यवसायात पदार्पण करून पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. भविष्यात पंढरपूर आणि मंगळवेढा हे स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ होण्याची शक्यता असून, यापैकी एका मतदारसंघातून अनिल सावंत आमदार व्हावेत, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू,” असे त्यांनी सांगितले.
अनिल सावंत म्हणाले, “भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून आतापर्यंत या भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारे सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. आता नव्याने दूध व्यवसाय सुरू केला असून, पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य सेवा, सहकार्य आणि न्याय देण्यासाठी भैरवनाथ डेअरीच्या माध्यमातून काम केले जाईल. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही भैरवनाथ शुगर उद्योग समूह आणि भैरवनाथ डेअरी फार्मच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार्याची भूमिका कायम राहील.”
यावेळी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, माजी उपनगराध्यक्ष मुजफ्फर काझी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, किसान गवळी, नगरसेवक किरणराज घाडगे, नगरसेवक भैय्यासाहेब कळसे, भैरवनाथ शुगरचे जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, शेती अधिकारी शिवाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैरवनाथ शुगरचे शेती अधिकारी कृष्णात लोंढे यांनी केले.पंढरपूर-मंगळवेढा परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नव्या संधी निर्माण करणाऱ्या या उपक्रमामुळे दूध संकलन, प्रक्रिया व शीतकरण व्यवस्थेला चालना मिळणार असून, परिसरातील दुग्ध व्यवसायाला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Post Views: 9