सोलापूर : प्रत्येकाच्या घरात गणरायाचे आगमन झाले की घराघरात आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते. मात्र समाजात असा एक वर्ग आहे, ज्यांच्या आयुष्यात परिस्थितीच्या संघर्षामुळे सण-उत्सवांचा आनंदच हरवून गेला आहे. अशाच वंचितांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलविण्याचा संवेदनशील प्रयत्न आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आला.
आस्था रोटी बँकेतर्फे सोलापूर शहरातील अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, बेघर निवारा केंद्र, मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसेच विविध गरजू ठिकाणी एकूण ३१ श्री गणेशमूर्तींचे वाटप करण्यात आले. “प्रत्येकाच्या घरी गणपती विराजमान होतो; मग ज्यांचे स्वतःचे घर नाही, ज्यांच्या आयुष्यात आधार नाही, त्यांच्या दारीही गणरायाचा आनंद पोहोचला पाहिजे,” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, अनाथ मुले तसेच बेघर आणि वंचित घटकांना सण-उत्सव साजरे करण्याची संधी मिळावी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि काही काळ का होईना, त्यांच्या दुःखाची जाणीव विसरून त्यांना उत्सवाचा आनंद घेता यावा, हा उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते श्री गणेशमूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर विविध आश्रम व संस्थांना गणेशमूर्तींचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी श्रीकांत डांगे, संस्थापक अध्यक्ष संभाजी आरमार, काका मेंडके,, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, किशोर चंडक, गुरुनाथ निंबाळे, सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. “गणराय प्रत्येकाच्या घरी पोहोचावा आणि कोणाच्याही आयुष्यात उत्सवाचा आनंद कमी पडू नये,” या भावनेने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
या उपक्रमासाठी नीलिमा हिरेमठ, पुष्कर पुकाळे, विनोद भोसले, विनोद भोसले, विद्या सिंगम, अर्चना कांबळे, श्रीदेवी बिराजदार, सुरेखा पाटील, दत्तात्रय दळवी, प्रकाश डोंगरे, मंजुषा विलास डोईफोड, बदामी सर, नंदा जाधव आणि विजय छचुरे यांच्यासह आस्था रोटी बँकेच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन दत्तात्रय दळवी यांनी केले.























