पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील वतीने रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यार्थ्यांची औद्योगिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी AV उद्योग समूह, बचेरी येथे भेट देऊन विविध लघुउद्योगांची प्रत्यक्ष माहिती घेतली.
AV उद्योग समूहाचे मालक विकास पिसे यांनी विद्यार्थ्यांना पत्रावळी, द्रोण, डिश, चहाचे कप आदी वस्तूंचे उत्पादन कसे केले जाते,याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उद्योग सुरू करण्यापासून आजपर्यंतची वाटचाल सांगताना त्यांनी उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल, उत्पादन प्रक्रिया, तयार मालाची विक्री, बाजारपेठेचा अभ्यास आणि व्यवसायातील अडचणी व संधी यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
विद्यार्थ्यांनी उद्योगातील विविध प्रक्रिया प्रत्यक्ष पाहून लघुउद्योग कसा सुरू करावा, त्यासाठी कोणते नियोजन करावे आणि स्वावलंबी होण्यासाठी कोणत्या कौशल्यांची आवश्यकता आहे, याचे ज्ञान घेतले. याशिवाय विद्यार्थ्यांनी परिसरातील वीटभट्टी, महावितरण (MSEDCL) संबंधित कामकाज व इंजिनिअरिंग वर्क्स अशा विविध व्यवसायांचीही माहिती घेतली.
या क्षेत्रभेटीवेळी संपूर्ण पिसे कुटुंबीय उपस्थित होते. पिसे कुटुंबीयांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.अशोक बागल सर, पर्यवेक्षक श्री. मासाळ सर, श्रीमती आठरे मॅडम, श्री. मोटकुळे सर, श्री. जमदाडे सर, श्री. जाधव सर तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य श्री. सचिन मदने उपस्थित होते. गुरुकुल सहाय्यक विभागप्रमुख श्री झाडे आर.आर.यांनी क्षेत्रभेटीचे संपूर्ण नियोजन केले.
क्षेत्रभेटीच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री. बागल सर यांनी संपूर्ण पिसे कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग व व्यवसायाची माहिती मिळाल्याने ही क्षेत्रभेट ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण करणारी ठरली. फोटो _ पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांची बचेरी येथे क्षेत्रभेट
Post Views: 6