बार्शी – संपूर्ण महाराष्ट्राचा लोकोत्सव असलेल्या गणेशोत्सवाला बार्शी शहरासह तालुक्यात भक्तिमय आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी वाजत-गाजत आगमन झाले.
यंदा गणेश चतुर्थी आणि हरितालिका व्रत एकाच दिवशी आल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. बार्शी गणेशमूर्ती, पूजा साहित्य, फुले, दुर्वा, मोदक, पेढे खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वीर सावरकर चौक ते पटेल चौक परिसरात पारंपरिक गणेशमूर्ती व उत्सव साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर परिसर, मंगळवार पेठेतील संत नामदेव मंदिर आणि जामगांव रोडवरील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयासमोरही गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल होते. यंदा ७३ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली. लहान-मोठ्या १९ मिरवणुका काढण्यात आल्या. बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील ५९ गावांपैकी १४, पांगरी हद्दीतील २८ गावांपैकी ११ आणि वैराग हद्दीतील ५४ गावांपैकी ७ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला.
कडक पोलीस बंदोबस्त
गणेशमूर्तीच्या आगमनावेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन उत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी बार्शी शहर पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलीस अधिकारी, अंमलदार, एसआरपीएफ जवान आणि होमगार्ड विविध ठिकाणी तैनात करण्यात आले होते.
Post Views: 7