बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी येथे आज मंगळवार रोजी स्पर्धा परीक्षा (UPSC) मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख व्याख्याते म्हणून श्री. जयजितसिंह जरीचंद उमाप, भारतीय वन सेवा केरळ हे उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून श्री. जयकुमार शितोळे हे तर प्रमुख उपस्थितीमध्ये अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक गुंड हे होते.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.
प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा जे. पी. गायकवाड यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश्य याप्रसंगी सांगितला. अशा कार्यक्रमामुळेच या अध्यापक विद्यालयातून आजपर्यंत ७५ पेक्षा अधिक अधिकारी घडले आहेत. तसेच अनेक विद्यार्थी शिक्षक म्हणून उत्तम काम महाराष्ट्रातील विविध शाळांमधून करत आहेत.
प्रमुख पाहुण्यांची ओळख प्राचार्य डॉ दीपक गुंड यांनी करुन दिली. याप्रसंगी प्राचार्य *डॉ. दीपक गुंड यांना ज्ञानयात्री आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेचअध्यापक विद्यालयास एकनाथ स्वाभिमान शिक्षक संघातर्फे जिल्हास्तरीय आदर्श अध्यापक विद्यालय पुरस्कार मिळाला त्याबद्दल देखील प्राचार्य व सर्व शिक्षक यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रमुख व्याख्याते.श्री. उमाप यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्पर्धा परीक्षेत आवश्यक बाबींचा उल्लेख केला. त्यांनी UPSC तसेच MPSC परीक्षा यात यशस्वी होण्यासाठी ठराविक वेळ द्यावा आणि या दरम्यान कष्ट करणे याशिवाय दुसरा पर्याय नसावा. अभ्यासाचे दैनंदिन वेळापत्रक तयार करावे. पुस्तकाची निवड करताना निवडक पुस्तक अनेकदा वाचावी. स्पर्धा ही अत्यंत कठीण झाली आहे. त्यामुळे ध्येय गाठण्यासाठी एखाद्या यंत्राप्रमाणे अभ्यास करत रहावा. उजळणी करणे, जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे, आपल्या चुकांचे परीक्षण करावे, स्वतःशी स्पर्धा करावी आणि अधिकाधिक यश मिळवावे. स्वतःच्या नोट्स तयार कराव्यात तसेच तंत्रज्ञानाचा अधिक वापर करावा. वर्तमानपत्रातील संपादकीय लेख वाचावे व त्याचा सखोल अभ्यास करावा. याबरोबरच विद्यार्थ्यांनी परीक्षेत तसेच मुलाखतीत यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा आहे आणि तो तुमच्या व्यक्तिमत्वात असावा. याबरोबरच त्यांनी जीवन जगताना विद्यार्थी म्हणून आपण कसे वागायला हवे याविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी राष्ट्रीय अभियंता दिन का साजरा केला जातो याविषयीची माहिती सांगितली. तसेच विद्यार्थी अभ्यासिका सारखा उपक्रम देखील राबविण्यात यावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रा.शेटे एस. एन. यांनी तर सूत्रसंचालन व नियोजन प्रा. जे. पी. गायकवाड यांनी केले.
Post Views: 8