सातारा : ‘ज्ञानगणेश’, ‘संगीत गणेश’, ‘क्रीडा गणेश’, ‘अर्थ गणेश’, ‘श्रीराम गणेश’, ‘काव्य-चित्र गणेश’ अशा संकल्पनांवर आधारित सजावटीनंतर साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेतील पाठकजी कुटुंबीयांनी सलग अकराव्या वर्षी रंगावली गणेश ही सजावट यंदा साकारली आहे.
रांगोळी म्हणजे केवळ शुभकार्याची सजावट नव्हे; तर ती भारतीय संस्कृतीतील एक अविभाज्य भाग आहे. शुभत्व, मांगल्य आणि सौंदर्य यांची सांगड घालत अनेक शतके पिढ्यान्पिढ्या घराच्या दाराशी रांगोळी उमटत आली. यंदाच्या गणेशोत्सवात याच पारंपरिक कलेला मध्यवर्ती स्थान देऊन ही आरास साकारण्यात आली आहे. रांगोळीची परंपरा प्राचीन आहे. महाराष्ट्रात ती ‘रांगोळी’, दक्षिण भारतात ‘कोलम’, बंगालमध्ये ‘अल्पना’, राजस्थानात ‘मांडणा’, तर बिहारमध्ये ‘अरीपना’ अशा विविध नावांनी आणि शैलींमध्ये ती आढळते. रांगोळीचा हा सारा इतिहास सजावटीमध्ये मांडण्यात आला आहे.
सजावटीची संकल्पना मांडणारे ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक पद्माकर पाठकजी म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृती, परंपरा जपत असताना कलेची आराधना करण्याचे हे निमित्त आहे. गणेशोत्सवाचे मूळ रूप दिवसेंदिवस बीभत्स आणि कर्कश होत असताना त्यातील सात्विकता, वैविध्य जपण्याचा आमचा हा छोटासा घरगुती प्रयत्न आहे. रांगोळी कलेची माहिती सर्वांना व्हावी आणि त्याचा प्रसार व्हावा हा या सजावटीमागचा हेतू आहे. ही सजावट बघून रांगोळीची प्रेरणा अनेकांना मिळावी, अशी इच्छा आहे.’’
या प्रकारच्या रांगोळ्यांचा समावेश
सजावटीमध्ये ठिपक्यांची रांगोळी, गालिचा, कोलम, वारली रांगोळी, संस्कार भारती रांगोळी, धान्य आणि डाळींची रांगोळी, तांदळाची रांगोळी, चैत्रांगण, फुलांची रांगोळी, पाण्यावरची रांगोळी, मॅटवरील रांगोळी असे रांगोळीचे विविध प्रकार साकारण्यात आले आहेत. भाग्यश्री पाठकजी, माधव खोले, महेश जाधव यांनी या रांगोळ्या साकारल्या आहेत. अक्षय चिकलगे यांनी रांगोळीचा इतिहास दृश्य स्वरूपात मांडला आहे.
Post Views: 9