बार्शी – गणेशोत्सवानिमित्त समाजप्रबोधन, वैचारिक जागृती आणि मनोरंजनाचा सुरेख संगम घडवून आणण्यासाठी वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळ, बार्शी यांच्यावतीने दि. २७ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बार्शीतील लिंगायत बोर्डिंग येथे दररोज सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमांना सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश असून महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे संचालक रावसाहेब मनगिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सन २००१ पासून वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या माध्यमातून यापूर्वी अनेक नामवंत वक्ते, विचारवंत व कलावंतांनी बार्शीकरांशी संवाद साधला आहे. बाबासाहेब पुरंदरे, मुजफ्फर हुसेन, नारायण सुमंत, सुधीर गाडगीळ यासारख्या दिग्गजांचा या व्याख्यानमालेत सहभाग राहिला आहे. यंदाही बार्शीतील रसिक श्रोत्यांच्या आवडी-निवडीचा विचार करुन विविध विषयांची निवड करण्यात आली आहे.
रविवार, २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध राजकीय विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर व प्रभाकर सूर्यवंशी यांचे भारतातील सध्याच्या राजकीय अराजक परिस्थितीला कारणीभूत कोण? या विषयावर भाष्य करणारे व्याख्यान विशेष करुन जेन झीसाठी होणार आहे. सोमवार, २८ सप्टेंबर रोजी डॉ. संजय उपाध्ये यांचे ‘मन करा रे प्रसन्न’ या विषयावर व्याख्यान होईल. मानसिक प्रसन्नता, कौटुंबिक ताणतणाव, तरुणांमधील आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि आनंदी जीवनशैली यावर ते मार्गदर्शन करणार आहेत.
मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील, कवी व कीर्तनकार अविनाश भारती आणि कवी विशाल मोहिते यांच्या सहभागाने ‘काव्यसंध्या’ रंगणार आहे. प्रेम, हास्य आणि सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या कवितांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. बुधवार, ३० सप्टेंबर रोजी संमोहनतज्ज्ञ राज गोंधळी, कोल्हापूर यांचा ‘हिप्नॉटिझम स्टेज शो’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे.
व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार असून, बार्शीतील प्रसिद्धीपासून दूर राहून सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही विशेष सत्कार केला जाणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाबासाहेब मनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अशोक मठपती, ॲड. सचिन शेटे, मनीष सावळे, प्रशांत शेटे, ॲड. केदार शेलार, गिरीश बरीदे, प्रभुलिंग स्वामी आदी उपस्थित होते.