सोलापूर : द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्रायोजित १० वी महात्मा हंसराज प्रश्नमंजुषा स्पर्धा (२०२६-२७) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या सामान्यज्ञानासोबतच बौद्धिक क्षमता, विश्लेषण कौशल्य आणि स्पर्धात्मक वृत्तीला चालना देणाऱ्या या स्पर्धेने यंदा यशस्वीपणे दहाव्या वर्षात पदार्पण केले.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत तब्बल १२८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध विषयांवर आधारित चाळणी परीक्षेतून १५ गुणवंत विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीत विद्यार्थ्यांनी ज्ञान, आत्मविश्वास आणि तत्परतेचे प्रभावी प्रदर्शन करीत चुरशीची लढत दिली.
पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे प्रशासक डॉ. विजयकुमार उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी तसेच डी.ए.व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. शिंदे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. उबाळे यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान पुरेसे नसून विविध क्षेत्रांतील अद्ययावत माहिती आणि व्यापक वाचन आवश्यक असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. दामजी यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. राजशेखर शिंदे, डॉ. रविकिरण जाधव आणि डॉ. आर. जी. गवळी यांनी जबाबदारी पार पाडली. अंतिम फेरीतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानपातळीचे आणि स्पर्धात्मकतेचे त्यांनी कौतुक केले.
स्पर्धेचे समन्वयक डॉ. एस. पी. देशमुख, सहसमन्वयक डॉ. आर. ए. रणवरे, तसेच जी. एस. घनाते, आर. आर. बेरुणगीकर, एम. जी. साखरे, जी. एन. सातालोलु, व्ही. बी. बिराजदार, के. एन. गडदे, ए. एस. बिराजदार, एम. एन. हराळे आणि सरोज साखरे उपस्थित होते.यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. डॉ. उबाळे, डॉ. दामजी आणि उपस्थित मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष किशोर चंडक यांनीही सर्व विजेते व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Post Views: 17