सोलापूर : महाविद्यालयीन जीवन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच करिअर घडविण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात रॅगिंगसारख्या चुकीच्या प्रवृत्तींपासून दूर राहून महाविद्यालयाचा परिसर सुरक्षित, सुसंस्कृत आणि रॅगिंगमुक्त ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सजग राहावे, असे आवाहन प्रा. डॉ. विजया महाजन यांनी केले.
वसुंधरा कला महाविद्यालयातील अँटी रॅगिंग समितीच्या वतीने ‘अँटी रॅगिंग : कायदा आणि सुशासन’ विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. रॅगिंग ही केवळ शिस्तभंगाची बाब नसून विद्यार्थ्यांच्या मानवी प्रतिष्ठेशी संबंधित गंभीर बाब आहे. गंमत म्हणून केलेल्या कृतीचाही समोरच्या विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर, शैक्षणिक प्रगतीवर आणि भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने कायद्याचे पालन करून दुसऱ्याच्या स्वातंत्र्य, सन्मान आणि सुरक्षिततेचा आदर करावा, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दिगंबर झोंबाडे यांनी विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करून नकारात्मक प्रवृत्ती दूर कराव्यात, असे आवाहन केले. डॉ. संगीता भोसले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. सुहास उघडे, तर आभार डॉ. मारोती घंटेवाड यांनी मानले. प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 15